नाशिक लोकसभा शिवसेना पक्षाने दोन वेळा लाखो मतांच्या फरकाने राखलेली आहे. महायुतीत नाशिकची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे, त्यामुळे हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार असणार आहे.- शिवसेना नेते संजय शिरसाठ
नाशिक । महायुतीकडून नाशिक लोकसभेचे तिकीट वाटप अद्याप बाकी असताना शिवसेना नेते आ.संजय शिरसाट यांनी नाशिकची जागा शिवसेनाच लढणार असल्याचे स्पष्ट सांगितल्याने महायुतीचे घटक पक्ष भाजप व राष्ट्रवादी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. दरम्यान विद्यमान खा. हेमंत गोडसे यांनी येथील शालिमार चौकात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले.
नाशिकच्या जागेवरुन महायुतीत प्रचंड तिढा सुरु असताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून नाशिकवर प्रबळ दावा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेतल्यानंतरही पहिल्या यादीत नाव न आल्याने गोडसे समर्थक चिंतेत होते, दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेले हेमंत गोडसे यांच्या बाबतीत शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, पालकमंत्री दादा भुसे, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय शिरसाट, आ.सुहास कांदे आदी नेत्यांमध्ये बैठक होऊन नाशिकच्या जागेवर निर्णय झाल्याचे समजते.