नाशिक । महायुतीच्या नाशिक लोकसभा तिकीट वाटपाचा तिढा तासा-तासाला वाढत असून राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध असल्याचे बॅनर मतदारसंघात काही ठिकाणी लावण्यात आल्याने चर्चेला उधान आले होते, संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजाचे गळ्यातील ताईत बनलेले, ओबीसी आरक्षण कोट्यातून मराठा आरक्षण न देण्याची ठाम भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ हे स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले जात असले तरी राष्ट्रवादीकडून सेकंड ऑप्शन म्हणून महायुतीकडून राष्ट्रवादी पक्षाचे नेते व व्यापारी बॅंकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे यांच्या नावाची चाचपणी सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
लोकसभेसाठी शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी तिकीट जाहीर होण्यापुर्वीच प्रचार सुरु केला असला तरी महायुतीकडून छगन भुजबळ हेच उमेदवार असल्याची चर्चा सुरु आहे, यामुळे नाशिकच्या जागेवर प्रचंड तिढा निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीसह भाजपचे काही नेते छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचे समोर आले आहे. असे असले तरी मराठा ओबीसी वाद निवडणुकीचा मुद्दा होऊन मतांवर परिणाम होऊ नये यासाठी निवृत्ती अरिंगळे यांच्या नावाची चाचपणी सुरु केल्याचे वृत्त आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अरिंगळे यांना अनेकदा चर्चेसाठी बोलावून कामकाजाचा आढावा घेतला होता. अरिंगळे यांचा व्यापारी बॅंकेच्या निमित्ताने मतदारसंघातील सुमारे 77 हजार सभासद कुटुंब आणि खातेदार, कर्जदार यांच्याशी संपर्क ही जमेची बाजू आहे. त्याच प्रमाणे गेल्या सहा महिन्यांपासून अरिंगळे यांनी मतदारसंघात प्रचार दौरा सुरु करुन नाशिक, सिन्नर, नाशिकरोड भागात मिसळपार्टीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केले होते.