action Blog classic concert ताज्या बातम्या राजकारण

मंडाले, गेल्या निवडणूकीत तुम्ही पवार साहेबांच्या विरोधात मते मागितली, विसरलात का ? – विक्रम कोठूळे

बालाजी देवस्थान प्रश्नावरुन विद्यमान आमदारांवर श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार गटाच्या मंडाले यांच्या आरोपाने देवस्थान विरोधी संघर्ष समितीत तीव्र नाराजी

नाशिक । देवळाली मतदार संघातल्या देवस्थानच्या प्रश्नावरुन विद्यमान आमदारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांच्या विषयी बेगडी प्रेम व्यक्त करणारे गेल्या निवडणुकीत पवार साहेबांच्या पक्षाच्या विरोधात मते का मागत होते असा सवाल उपस्थित करुन बालाजी देवस्थान प्रश्न सुटणे हा शेतक-यांच्या भावनेचा विषय आहे, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शेतक-यांच्या विषयावर राजकारण करणे कोणाच्याच हिताचे ठरणार नाही असा थेट इशारा देवस्थान विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. मंडाले यांच्या आरोपाने विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली गावातील शेतकरी तीव्र नाराज झाले आहे. 

देवळाली मतदार संघातील बालाजी देवस्थान चा पन्नास वर्षे जुना प्रश्न सुटल्याने तीन गावच्या हजारो शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत, देवळाली मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार लक्ष्मण मंडाले यांनी विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यावर बालाजी देवस्थानच्या मुद्यावर श्रेयवादाचा आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे, तीन दिवसांपुर्वी देवळाली मतदार संघातील 17 गावातील सिटी सर्वे व उता-यातील तफावत दूर करण्यासाठी आ. सरोज अहिरे यांनी विहितगाव येथे आयोजित शेतकरी मेळावाचे निमित्त साधून मंडाले यांनी आ. अहिरेंवर निशाना साधला होता, यावरुन बालाजी देवस्थान विरोधी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. मंडाले यांच्या श्रेयवादाच्या मुद्यावरुन विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली गावच्या शेतक-यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.  

देवस्थान विरोधी संघर्ष समितीचे संजय हांडोरे यांनी सांगितले की, बालाजी देवस्थानचा प्रश्नाचे गेल्या पन्नास वर्षांपासून भिजत घोंगडे होते, विद्यमान आमदार सरोज आहिरे या 2018 साली नाशिक महानगरपालिकेत भाजप पक्षाच्या नगरसेविका असल्याने आ.आहिरे यांच्या माध्यमातून आम्ही शेतकरी तत्कालीन पालकमंत्री गिरिश महाजन व चंद्रकांत पाटील यांची भेट घेत दाद मागितली होती, त्यानंतर 2019 साली आ.सरोज आहिरे या राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर आमदार झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात बालाजी देवस्थानच्या प्रश्नाचा समावेश प्रथमस्थानी होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर महाविकास आघाडीच्या सत्ताधारी आमदार म्हणुनच सरोज आहिरे यांच्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सोबत झालेल्या बैठकीत बालाजी देवस्थानचा प्रश्न सोडविण्याचा अंतिम निर्णय झाला आणि त्यानुसारच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते विहितगावात दुरुस्त सातबारा उता-याचे वाटप केले गेले. पन्नास वर्षापुर्वीचा प्रश्न सुटल्याने तीन गावांतील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे, देवस्थानच्या प्रश्नाची माहीत नसलेल्यांनी श्रेयवादाच्या नावाखाली राजकारण करु नये. आ.अहिरेंनी वेळोवेळी सत्तेत असणा-या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेस सर्वच पक्षाच्या नेत्यांना साकडे टाकून देवस्थानचा प्रश्न सोडविला आहे याचे प्रत्यक्ष साक्षीदार आम्ही शेतकरी आहोत. देवस्थानचे नाव उता-यावरुन कमी होणे हजारो शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, यावरुन कोणीही राजकारण करु नये असा इशारा हांडोरे यांनी दिला.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवानेते व बालाजी देवस्थान विरोधी संघर्ष समितीचे विक्रम कोठुळे म्हणाले की, देवस्थान च्या प्रश्नावर आक्षेप घेणारे मंडाले हे शेतक-यांच्या भावनेशी खेळत आहेत, गेल्या पन्नास वर्षांचा प्रश्न सोडवण्यासाठी या संधीसाधू महाशयांनी एकदाही प्रयत्न केलेले नाहीत, श्रेयवाद करुन हजारो शेतक-यांना दुखावले आहे, गेल्या विधानसभा निवडणुकीतील शरद पवारांनी तिकीट नाकारल्यानंतर रात्रीतून मनसे ची उमेदवारी करणारे मंडाले तब्बल चार वर्षे भूमिगत असल्याचा आरोप कोठुळे यांनी केला आहे. , राष्ट्रवादीत फूट पडल्याने मंडाले यांचे बेगडी प्रेम उफाळून आले आहे, नवी संधी मिळणार या उद्देशाने विद्यमान आमदारांवर आरोप करुन आपले अस्तित्व दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे कोठुळे यांनी सांगितले


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *