नाशिक । देवळाली मतदारसंघातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा बालाजी देवस्थान प्रश्न मार्गी लागला असला तरी त्यावरुन आता नव्याने श्रेयवादाचे राजकारण सुरु झाले आहे, सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले यांनी विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी नुकताच घेतलेल्या शेतकरी मेळाव्यावरुन प्रश्न उपस्थित करत श्रेयवादाचा आरोप केला आहे.
देवळाली मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लक्ष्मण मंडाले यांची उमेदवारी अंतिम टप्प्यात असतांना ऐनवेळी तत्कालीन भाजपच्या नगरसेविका व माजी आमदार दिवंगत बाबूलाल अहिरे यांच्या कन्या सरोज अहिरेंना यांना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण मंडाले यांनी ऐनवेळी मनसे पक्षाकडून आपल्या मुलासाठी उमेदवारी घेतली होती. या निवडणूकीत विद्यमान आमदार यांनी माजी आमदार योगेश घोलप यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.तर मंडाले यांना 3198 मते मिळाली होती, विद्यमान आमदार सरोज अहिरे यांनी गेल्या आठवड्यात विहितगाव येथे सातबारा उतारा व सिटी सर्वेच्या रेकाॅर्ड मध्ये मोठी तफावत असलेल्या व इतर समस्या असलेल्या शेतक-यांचा मेळावा आयोजित केला होता. मंडाले यांनी आ.अहिरे यांना याच शेतकरी मेळावा व बालाजी देवस्थान च्या मुद्यावरुन लक्ष केले आहे.
मंडाले म्हणाले की, शेतक-यांचा कांद्याचा प्रश्न उपस्थित झाल्यावर शरद पवार यांनी चांदवडला येवून आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिंडोरीत आक्रोश मोर्चात सहभाग घेतला, हे सर्व सुरु असताना स्थानिक आमदारांनी सहभाग घेणे आवश्यक होते, असे सांगून मंडाले यांनी देवळाली मतदारसंघातील बालाजी देवस्थान च्या मुद्यावरुन विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्यावर श्रेयवादाचा आरोप केला असून सदर प्रश्न महाविकास आघाडी सरकारने सोडविला असून कोणाचे वैयक्तिक श्रेय नसल्याची टीका केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे, ते म्हणाले की आघाडी सरकारच्या काळात, शरद पवार यांच्या सूचनेनंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून प्रश्न सुटला आहे, विद्यमान आमदारांनी प्रयत्न केला असला तरी तो प्रश्न सुटण्यासाठी महाविकास आघाडीला श्रेय दिले पाहीजे, कोणीही वैयक्तिक श्रेय घेऊ नये असा सवाल मंडाले यांनी विद्यमान आमदार सरोज अहिरेंच्या शेतकरी मेळाव्यावर प्रश्न उपस्थित केला.