action concert fun Video ताज्या बातम्या मनोरंजन

महाशिवरात्री । त्र्यंबकेश्वर ला धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

नाशिक । श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टची महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून महाशिवरात्री निमित्त श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगाचे मंदिर शुक्रवार दि.०८ फेब्रुवारीच्या पहाटे ०४:०० वाजेपासून शनिवार दि.०९ फेब्रुवारीच्या रात्री ०९:०० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनार्थ खुले राहणार आहे.  महाशिवरात्री निमित्त येथे श्री त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून भाविकां करता याकाळात गर्भगृह दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे मंदिराला आकर्षक विद्युत रोशनाई करुन सजविण्यात येणार आहे. तसेच मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार उत्तर आणि पूर्व महाद्वार, इ. ठिकाणी फूलांची सजावट करण्यात येणार आहे. येणाऱ्या भाविकांची सोय ही नुकत्याच बांधण्यात आलेल्या भव्य दर्शन मंडपातून व त्याच्या दोन्ही विंग मधून करण्यात येणार आहे. दर्शनार्थ येणाऱ्या भाविकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. तातडीने दर्शन घेऊ इच्छीणाऱ्या भाविकांसाठी देणगी दर्शन सुरु राहणार आहे. देणगी दर्शनासाठी आलेल्या भाविकांकरिता सर्व सुविधांनी युक्त भव्य दर्शन मंडप बनविण्यात आलेला आहे.

महाशिवरात्री उत्सवा निमित्त श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे २ दिवसांकरीता सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये दि. ०७/०३/२०२४ रोजी संध्याकाळी, ०७.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा संगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून दि.०९/०३/२०२४ रोजी संध्याकाळी ०७.०० ते ०९.०० वाजेपर्यंत ओम नटराज अॅकडमी तर्फे कथ्थक नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. नृत्य दिग्दर्शन मयुरी बेडककर यांनी केलेले आहे.

सदर सर्व कार्यक्रम हे श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पटांगणात होणार आहे. त्याच बरोबर परंपरेनुसार दि. ०८/०३/२०२४ रोजी दुपारी ०३:०० वाजता श्री त्र्यंबकराजांची पालखी मंदिरातुन निघून पारंपरिक मार्गानुसार तिर्थराज कुशावर्त येथे षोडशोपचार पुजा करुन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पालखी पारंपरिक मार्गाने पुन्हा देवस्थानमध्ये येणार आहे. 

तसेच श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे दि. ०८/०३/२०२४ रोजी परंपरेप्रमाणे श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंगावर लघुरुद्र अभिषेक सायंकाळी ०५.०० वाजता करण्यात येणार आहे व महाशिवरात्री निमित्त दरवर्षी प्रमाणे भगवान श्री त्र्यंबकराजांची विशेष महापूजा व पालखी सोहळा रात्री ११:०० ते ०२:३० या वेळेत होणार आहे. या सर्व गोष्टींचा भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी आनंद घ्यावा व देवस्थान ट्रस्टला सहकार्य करावे, ही विनंती. तसेच ग्रामस्थांसाठी दर्शनासाठी चे नियोजन हे फलकावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *