action Blog ताज्या बातम्या राजकारण

मंडाले यांच्या देवस्थान श्रेयवादाच्या वक्तव्यावरुन शेतकरी संतप्त

नाशिक । देवळाली मतदारसंघातील बालाजी देवस्थान प्रकरणावरुन शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले यांनी देवस्थान प्रश्नाचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये असे वक्तव्य करुन विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला होता, मंडाले यांच्या वक्तव्यावर देवस्थान विरोधी संघर्ष समितीच्या तीन ही गावातील शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

देवळाली मतदार संघातील विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली या तीन गावातील हजारो शेतक-यांच्या जमिनींच्या उता-यावर देवस्थानचे नाव कमी करण्यासाठी असंख्य शेतकरी झटत होते, देवस्थानच्या मुद्द्यावरुन मंडाले यांनी विहितगाव येथे आ.सरोज अहिरे यांनी महानगरपालिका हद्दीतील 17 गावातील सिटीसर्वे व उता-यावरील तफावत असलेल्या शेतक-यांचा मेळावा घेतला होता, या मेळाव्याचे निमित्त साधून मंडाले यांनी आमदार सरोज अहिरे यांच्यावर निशाणा साधल्याने नवा वाद सुरु झाला आहे. यावरून पक्षीय पातळीवर अजित पवार गटाचे विक्रम कोठुळे यांनी मंडाले यांना परखड प्रतिउत्तर दिले आहे. त्यानंतर आता तीन गावातील बालाजी देवस्थान प्रकरणातील शेतकरी आक्रमक झाले आहे. 

देवस्थानच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या श्रेयवादाचे वृत्त समजताच बेलतगव्हाण येथील शेतकरी व संघर्ष समितीचे सुनील धुर्जड यांनी मंडाले यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली, ते म्हणाले की, 2016 पासून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संजय हांडोरे, सुनील धूर्जड, संजय कोठुळे,आदी शेतकरी कागदपत्रांचे पुरावे व नोंदींची जमवाजमव करत होते, संघर्ष करत होते, 2018 साली भाजपच्या तत्कालीन नगरसेविका सरोज अहिरे यांनी याबाबत तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु केला होता, देवस्थानचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन व मंत्रालयात अनेक बैठका झाल्या, या बैठकांत कुठेही मंडाले दिसले नाही, की एखादा अर्ज खरडला नाही, जे मंडाले गेल्या विधानसभा निवडणुकीत देवळालीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी धडपडत होते, त्यावेळी संपुर्ण निवडणूक प्रक्रियेत देवस्थानचा कुठेही उल्लेख त्यांनी केला नाही, मग मंडाले अचानक देवस्थानचा मुद्दा का उपस्थित करत आहे असा सवाल धूर्जड यांनी केला आहे. 

मंत्रालयातील काम आटोपल्यानंतर भूक लागल्यानंतर जिथे जागा मिळेल तिथे जेवण करणारे शेतकरी

विहितगावचे संजय कोठुळे यांनी मंडाले यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून काही लोकांचा संबंध नसताना शेतक-यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या बालाजी देवस्थान वरुन श्रेयवाद करत आहे, आ.सरोज अहिरे यांनी बालाजी देवस्थानचा प्रश्न सोडविण्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहेत, आम्ही प्रत्येक प्रक्रियेत सोबत आहोत. शेतक-यांसाठी देवस्थान चा निकाल लागला तेव्हा हजारो शेतक-यांनी आनंदोत्सव साजरा केला. मनोली गावातील अनिल बोराडे, कैलास बोराडे, कैलास आढाव, आदी शेतकरी यांनी मंडाले यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

देवस्थान चे नाव कमी करण्याच्या निर्णयानंतर सातबारा उता-यावरील नोंदी बदलण्याचे काम कित्येक दिवस पहाटे पर्यंत सुरु होते.

शेतकरी संजय कोठुळे पुढे म्हणाले की, आ.अहिरे यांनी मनोली गावात अनेक वेळा बैठका घेऊन बाधित शेतक-यांना एकत्रित करुन देवस्थान चे नाव कमी करण्यासाठी प्रबोधन केले, त्यानंतर आ. अहिरेंच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या लढ्याला यश मिळून उता-यावरुन देवस्थानचे नाव कमी केल्याचा निर्णयानंतर विहितगाव, बेलतगव्हाण व मनोली गावातील शेतक-यांनी विहितगाव येथे आ. अहिरे यांचे स्वागत करुन मिरवणूक काढण्यात आली होती, त्यानंतर थोड्याच दिवसात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते उता-यांचे वाटप करण्यात आले होते हे कोणीही विसरणार नाही, शेतक-यांचा प्रश्न सुटण्यासाठी शेतक-यांच्या खांद्याला खांदा लावून आ. अहिरे यांनी मंत्रालयात शेकडो चकरा मारल्या आहेत, हे विसरुन चालणार नाही, देवस्थान वरुन कोणी श्रेयवादाचे राजकारण करत असेल तर खरे श्रेय आ.अहिरे यांनाच द्यायला हवे अशी स्पष्ट भूमिका कोठुळे यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *