खा.हेमंत गोडसे यांच्या अथक प्रयत्नातून नाशिकरोड लगत असलेल्या ट्रॅक्शन मशीन कारखाना परिसरात नव्याने तयार झालेल्या रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर, आदींच्या हस्ते उद्घाटन होत आहे. नाशिकच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने बंद पडलेला नासाका यशस्वी सुरु केल्यानंतर नाशिकरोडला रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखाना सुरु होणे नाशिकच्या विकासात भर आहे.
श्रीधर गायधनी । नाशिक
नाशिकरोड भागातील ट्रॅक्शन मशिन कारखान्याच्या बाजूला तयार झालेल्या मध्य रेल्वेच्या रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याचे उद्घाटन सोमवारी दि.26 फेब्रुवारी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, खा. हेमंत गोडसे व रेल्वे अधिकारी यांच्या हस्ते होत आहे, सप्टेंबर 2023 महिन्यात या व्हील सेट निर्मिती चाचणी यशस्वी झाल्यानंतर दोन दिवसांत व्हील निर्मिती कारखाना सुरु होणे नाशिकच्या विकासात शाश्वत भर पडली आहे.
खा. हेमंत गोडसे यांच्या पाठपुराव्याने नाशिकरोड भागातील ट्रॅक्शन मशिन कारखान्याच्या बाजूला असलेल्या जागेत 17 जानेवारी 2019 रोजी रेल्वे व्हील सेट बनविण्याच्या कारखान्याचे भूमिपूजन तत्कालीन केंद्रीय अवजड मंत्री अनंत गिते, तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते संपन्न् झाले होते. त्यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे भाऊसाहेब चौधरी, माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, आ. दराडे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, उपजिल्हा प्रमुख जगन आगळे, शिवसेनेच्या दिवंगत नेत्या सत्यभामा गाडेकर, पंडित आवारे, जयश्री खर्जुल, सुनिता कोठुळे, महेश बडवे, नितीन खर्जुल, संतोष साळवे आदी उपस्थित होते.
रेल्वेची सुमारे 150 एकर जागा उपलब्ध असून या ठिकाणी नव्याने प्रकल्प उभारणी साठी ट्रॅक्शन मशिन कारखान्यातील कामगार नेते भारत पाटील यांच्यासह संघटनेच्या वतीने रेल्वे ला लागणा-या मिनरल वाॅटर बाॅटलिंग प्रकल्प किंवा इतर पुरक प्रकल्प सुरु करण्यासाठी कित्येक वर्षांपासून मागणी होती, त्यासंदर्भाने कामगार युनियन व खा. गोडसे यांच्यात अनेकदा बैठकांचे आयोजन करण्यात आले होते, खा. गोडसे यांनी नाशिक मधील युवकांना नव्याने रोजगार उपलब्ध करण्यासाठी हालचाली सुरु केल्यानंतर, मध्य रेल्वेचे अधिकारी यांच्या समवेत जागेची पाहणी करुन नव्या प्रकल्पासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला होता, त्यानुसार रेल्वे व्हील सेटच्या कारखान्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली होती.
एकलहरे रोड वरील रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्यासाठी मनुष्य बळाची आवश्यकता असल्याने त्यासाठी प्रशासनाने रेल्वे बोर्डाकडे मनुष्य बळाची मागणी केलेली आहे, परंतू रेल्वे बोर्डाकडून अद्याप नोकर भरतीला हिरवा सिग्नल मिळालेला नाही, म्हणून ट्रॅक्शन मशिन कारखान्यातील काही कामगारांना प्रशिक्षण देत याठिकाणी व्हील सेट निर्मिती सुरु केली आहे. खा. गोडसे यांनी रेल्वे बोर्डाला पत्र देवून सदर कारखान्यात मनुष्य बळ पुरवठ्यासाठी मागणी केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून सुरु असलेले कारखान्याचे काम पुर्ण झाल्यानंतर व्हील सेट निर्मिती साठी केंद्रीय मंजूरीच्या इतर प्रक्रिया पुर्ण होण्यास विलंब लागला होता, सर्व तयारी पुर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सदर कारखान्याचे उद्घाटन शुक्रवारी दि.23 फेब्रुवारी रोजी करण्याचे नियोजन केले होते, मात्र, काही कारणास्तव सोमवारी दि.26 फेब्रुवारी रोजी होत आहे.