नाशिक । पंचवटी परिसरातील डाॅ. कैलास राठी हल्ला प्रकरणी संशयिताला 24 तासात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आर्थिक देवाण घेवाणीच्या वादातून डाॅ. राठी यांच्यावर हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिंडोरी रोड वरील सुयोग हॉस्पिटल मध्ये डाॅ. कैलास राठी यांना ठार मारण्याच्या उद्देशाने शुक्रवारी (दि.23) रात्री च्या वेळेस अज्ञात व्यक्तिने राठी यांच्या गळ्यावर व डोक्यावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी करुन फरार झाला होता. डाॅ. राठी यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले असून तब्बेत गंभीर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शन करुन संशयितास अटक करण्याच्या सूचना केल्या होत्या, पंचवटी पोलीस ठाण्याचे निरिक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. घटनेनंतर डाॅ. राठी यांच्या पत्नी डाॅ. रिना कैलास राठी यांच्या तक्रारी वरुन पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पंचवटी पोलीस ठाण्याचे हवालदार शेखर फरताळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे संशयित राजेंद्र चंद्रकांत मोरे (37) रा. जुना आडगाव नाका हा संतोष टी पाईंट परिसरात येणार असल्याचे समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधूकर कड यांनी सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, शेखर फडताळे, संतोष जाधव, राजेश सोळसे, यतीन पवार, श्रीकांत कर्पे, युवराज गायकवाड या पथकाने सापळा रचून ताब्यात घेत पंचवटी पोलीस ठाण्यात आणून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर हे तपास करत आहे.