नाशिक । शहरातील अटल स्वाभिमान दिव्यांग भवनाचे ई-लोकार्पण कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व दिव्यांग विभाग मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांना जाणीवपूर्वक टाळल्याच्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने मनपा मुख्यालयासमोर आंदोलन करत आ.कडू यांच्या उपस्थितीत पुन्हा उद्घाटन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद शिंदे, दिव्यांग जिल्हाप्रमुख रवींद्र टिळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि.12) सकाळी महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, स्थानिक लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासनाने आ. कडू यांना माहिती न देता ऐनवेळी फोन करुन कार्यक्रमाची माहिती दिली हे योग्य नाही, त्याच प्रमाणे कार्यक्रम पत्रिकेत आ.बच्चू कडू यांच्या नावाचा चूकीचा उल्लेख म्हणजे जाणीवपूर्वक टाळले गेले आहे, त्यामुळे प्रशासनाने दहा दिवसांत नव्याने नियोजन करुन पुन्हा कार्यक्रम घ्यावा, यावर निर्णय न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाप्रमुख शरद शिंदे यांनी दिला.
यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, उत्तर महाराष्ट्र दिव्यांग प्रमुख जेकब पिल्ले, समाधान बागुल, शहर प्रमुख संतोष माळोदे, तालुका प्रमुख गोकुळ कासार, आयटी प्रमुख कमलाकर शेलार, शहर प्रमुख शाम गोसावी, संध्या जाधव, वैशाली अनवट, सीमा पवार, संतोष मानकर, भाउसाहेब सांगळे, यशवंत सापुते आदी उपस्थित होते.