नाशिक । आपण ज्या शाळेत ज्ञानार्जन करतो त्या शाळेच्या शेवटच्या शैक्षणिक वर्षाला निरोप देताना भावनिक होणे साहजिकच आहे. गुरु शिक्षक आणि आई-वडील फक्त माहुताचे काम करत असतात, परंतु जीवनाची संपुर्ण लढाई स्वतःलाच लढायची असते. कष्टाला पर्याय नसून संघर्ष हेच जीवन आहे असे प्रतिपादन उपायुक्त डाॅ. सिताराम कोल्हे यांनी केले.
कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय गंगापुर रोड नाशिक येथे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना निरोप समारंभाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन पोलीस उपायुक्त डाॅ. सिताराम कोल्हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक कुणाल गोराणकर व व्यासपीठावर पर्यवेक्षक किशोर भारंबे जेष्ठ शिक्षक शिक्षक सुनिल आहिरे ,नरेंद्र पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.जेष्ठ शिक्षक सुनिल आहिरे यांनी प्रमुख अतिथींचा परीचय करुन दिला.प्रसंगी या शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी च्या तीनही वर्गातुन उत्तम कामागिरी करणाऱ्या ७ आदर्श विद्यार्थ्यांचा डाॅ.कोल्हे यांच्या शुभहस्ते सन्मानचचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.त्यानंतर काही निवडक विद्यार्थ्यांनी इ.५ वी ते १० वी या शिक्षण प्रवासात गुरुजनांनी दिलेल्या ज्ञानदान याबरोबरच जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. डाॅ. कोल्हे यांनी कौन बनेगा करोडपतीच्या १६ प्रश्नांच्या शृंखलेचा आपल्या करियरशी समन्वय साधुन जेम्स क्लियर यांच्या आॕटोमिक हॅबिट या पुस्तकाचा संदर्भ देऊन दिवसाला एक टक्का प्रगती केल्यास वर्षात ३७.७८ पटीने आपल्यात बदल होतो असे उदाहरणासह पटवुन दिले.
मुलांनी शिस्त वाढवून व्यसनाधीनता तसेच इतर गुन्ह्यांपासून दुर रहावे हे सांगुन एखाद्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार झाल्यास भविष्यकाळातील सर्व करियर संपुष्टात येते असेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा शेवट त्यांनी गुरु ठाकुर यांच्या असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावुन अत्तर नजर रोखूनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर या रचनेने केला. उपशिक्षक प्रमोद पाटील संजीव डामरे महेंद्र देवरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचाल बरोबर परीक्षेसंदर्भात सूचना दिल्या.मुख्याध्यापक कुणाल गोरणकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्यात.निरोपार्थी विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कुणाल गोराणकर यांना शाळेसाठी भेटवस्तु देऊन शाळेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन मनिषा गांगुर्डे यांनी केले.कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.