Blog

मराठी संस्कृतीचे संस्कार पुढील पिढीवर रुजवावे – उपायुक्त काळे

नाशिक । परकीय आक्रमणे होऊनही मराठी भाषेला मिटवू शकली नाहीत. कारण ही भाषा इथल्या मातीमध्ये खोलवर रूजली असून, मराठी संस्कृती व भाषेचा हा संस्कार पुढील पिढीमध्ये रूजवण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे उपायुक्त रमेश काळे यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगकर्मी विवेक गरुड होते. यावेळी उपायुक्त राणी ताटे, उपायुक्त मंजिरी मनोरकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपसंचालक ज्ञानोबा इगवे, तहसिलदार मंजुषा घाटगे, हदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी, कवी संमेलनाचे अध्यक्ष मिलिंद गांधी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, बाळासाहेब मगर, सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी सचिव सुरेश गायधनी यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा ही आपली अस्मिता असून, तिच्याबद्दल प्रत्येकाने आत्मियता बाळगणे काळाची गरज आहे. मराठी माणसाने मराठीचा अभिमान, स्वाभिमान बाळगायला हवा, असे सांगून उपायुक्त रमेश काळे म्हणाले, नाशिक शहराला साहित्यिकांचा समृद्ध वारसा लाभला आहे. नाशिकच्या अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ही परंपरा पुढे सुरू राहावी, त्यात वृद्धी व्हावी, यासाठी प्रत्येक नाशिककराने प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून श्री. काळे यांनी उपस्थितांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्य शासनाच्या वतीनेही मराठी भाषा संवर्धनासाठी विविध विभाग, मंडळे व उपक्रम यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सांगून उपायुक्त रमेश काळे म्हणाले, इंग्रजीचे महत्त्व वाढत असले तरी आजही खेड्या-पाड्यात, ग्रामीण भागात भावनेची आणि व्यवहाराची भाषा मराठी आहे. अहिराणी, वऱ्हाडी, माणदेशी, मालवणी, कोकणी अशा त्या त्या प्रांतातील लोकांनी भाषा टिकवली आहे. आपणही आपल्या वैयक्तिक स्तरावर दैनंदिन जीवनात मराठीचा वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

रंगकर्मी विवेक गरूड यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात सृजनांचा उत्सव ही कविता सादर केली. तसेच कवी संमेलनाचे अध्यक्ष मिलिंद गांधी यांनीही कवी संमेलानाच्या उद्घाटनप्रंसगी आपली कविता सादर केली. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. त्यानंतर 23 एपिल 2024 रोजी होणाऱ्या गोदावरी पुस्तक महोत्सवाच्या लोगोचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन सुहास सबनीस यांनी केले तर आभार तहसिलदार (सामान्य शाखा) मंजुषा घाटगे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *