शिवसेनेत सामान्य शिवसैनिक, शाखाप्रमुख, तालुकाप्रमुख, भगूर नगरपालिकेचा पहिला थेट नगराध्यक्ष, तर गेल्या तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली, गेल्या सहा महिन्यापासून लोकसभा उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नवचैतन्य देण्याचे काम केले. त्याची पावती अशा पद्धतीने मिळेल अशी अपेक्षा नव्हती, रात्रीतून कुठे माशी शिंकली याबाबत मी मातोश्रीवर जावून पक्षप्रमुखांना आपण विचारणा करणार – करंजकर
देवळाली कॅम्प । महाविकास आघाडीने नाशिक लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख दावेदार मानले गेलेले विजय करंजकर यांना ऐनवेळी डच्चू देत सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषित केल्याने करंजकर यांच्या समर्थकांमध्ये कमालीचे वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले. उद्धव साहेब शब्दाला जागा, निष्ठावंतांना न्याय द्या. अशा घोषणा देत करंजकर यांच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत विजय करंजकर यांनी आपल्यावर अन्याय झाला असला तरी आपला पक्ष प्रमुखांवर विश्वास असल्याचे सांगत दोन दिवसांत पक्षश्रेष्ठींना भेटून आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले असले तरी लढणार व पाडणार असल्याची ठाम भूमिका स्पष्ट केली.
नाशिक लोकसभा निडवणूकी बाबत वरिष्ठ पातळीवरुन बुधवार दिनांक 27 रोजी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपल्या 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, यात नाशिक लोकसभेसाठी विजय करंजकर यांचे नाव आघाडीवर असताना रात्रीतून अचानक सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव घोषित होताच भगूर येथील करंजकर यांच्या निवासस्थानी असंख्य समर्थकांनी गर्दी केली होती. त्यानंतर नाशिकरोड येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप, माजी जि.प. सदस्य संजय तुंगार, तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के, पूर्व विधानसभा प्रमुख नितीन चिडे, भगूरच्या माजी नगराध्यक्षा अनिता करंजकर, उपमहानगर प्रमुख योगेश देशमुख, तालुका संघटक चंद्रकांत गोडसे, चंद्रकांत कासार, पै. प्रवीण पाळदे, सागर भोजने, भगूर शहरप्रमुख विक्रम सोनवणे, दिपक बलकवडे, प्रमोद घुमरे, प्रमोद मोजाड, वैभव पाळदे, रोहित कासार, पंडीत झाडे, दीपक गायधनी, नवनाथ गायधनी, मतदारसंघातून ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करंजकर समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करतांना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी करंजकर म्हणाले की, आपण आज तागायत पक्षाशी निष्ठावंत राहत पक्षप्रमुखांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत तब्बल तेरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख पदावर काम करत असताना तळागाळापर्यंत शिवसेना पोहचविण्याचे काम केले, म्हणून मला 2014 व 2019 यावेळी लोकसभेची संधी होती, मात्र, आपण पक्षाशी निष्ठावंत असल्याने पक्ष प्रमुखांनी दिलेल्या शब्दाचा मान राखत त्या-त्या वेळी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणला.
आताच्या निवडणूकीसाठी गेल्या एक वर्षापासून पक्षप्रमुखांनी मला लोकसभा निवडणूकीसाठी शब्द देत प्रचाराला लागण्याचे आदेश दिले होते, त्याप्रमाणे अनेकदा पक्षाकडून अनेकदा करंजकर हेच उमेदवार असल्याचे जाहीररित्या सांगितले गेल्याने आपण निर्धास्तपणे प्रचारासह अन्य यंत्रणा कार्यान्वित केली होती, काही दिवसांपुर्वी माजी आमदार वाजे यांचेशी चर्चा केली होती, त्यावेळी वाजे यांनी आमची ती ताकद नाही, असे सांगितल्याने आपण अधिक जोमाने मतदारसंघ पिंजून काढला, पक्षश्रेष्ठी शब्दाला जागतील याची पुर्ण शाश्वती असल्याने आपणही सर्व शिवसैनिक व पदाधिका-यांना सोबत घेऊन कामाला लागलो होतो. ऐनवेळी पक्षाकडून ज्यांनी उमेदवारीला नकार दिला होता त्यांनाच उमेदवारी जाहीर झाल्याने तमाम शिवसैनिकांना धक्का बसला, त्यामुळे त्यांच्या भावना लक्षात घेऊन आपण आता दोन दिवसानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत जाब विचारणार असल्याचे करंजकर यांनी सांगितले, ते पुढे म्हणाले की, पक्षाने आपल्यावर अन्याय केला असला तरी आपण लढणार व पाडणार हीच भूमिका कायम ठेवणार असल्याचे सांगितले.