नाशिक । नाशिक लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचाच उमेदवार असल्याची भूमिका वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून बुधवारी रात्री विद्यमान खा. हेमंत गोडसे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, आ.भरत गोगावले यांच्या सोबत खा. गोडसे, पदाधिकारी व समर्थकांची एक तास चर्चा झाली. या बैठकीत संपुर्ण शिवसेना खा. गोडसे यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास मिळाल्याने समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे.
सातारा ची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आल्याने निर्माण झालेला पेच सोडविण्याचा प्रयत्न सुरु असतांना शिवसेनेचा हक्क असलेल्या जागेवर भाजप व राष्ट्रवादी ने दावा केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव पुढे आल्याने शिवसेना कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. बुधवारी (दि.27) शिवसेना कार्यालयात झालेल्या बैठकीत संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. बुधवारी रात्री खा. गोडसे, शिवसेना पदाधिकारी व शेकडो समर्थकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर जावून भेट घेतली.
महायुतीच्या नाशिक लोकसभेवर यापुर्वी दोन वेळा लाखो मताधिक्याने निवडून आलेल्या खा. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीला महायुतीकडूनच्या घटक पक्ष असलेल्या भाजप व राष्ट्रवादीने आव्हान दिल्याने शिवसैनिक संतप्त आहे. पालकमंत्री दादा भुसे, आ. सुहास कांदे, व खा. गोडसे समर्थकांनी गेल्या आठवड्यात थेट ठाणे गाठले होते, त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या उमेदवारीवर शिवसेनेचाच दावा असल्याचे सांगून खा. गोडसे यांच्या उमेदवारीला हिरवा सिग्नल दिला होता.