पुणे । पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे इच्छुक असून त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर पुणे दौ-यावर असताना वसंत मोरे यांनी भेट घेतली, यामुळे मोरे हे वंचित कडून उमेदवारी करणार का याकडे लक्ष लागून आहे.
वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे यांची शुक्रवारी पुणे येथे भेट झाली, दोघांच्या भेटी संदर्भात विचारले असता सकारात्मक चर्चा झाल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. यावेळी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला, ते म्हणाले की, राज्यातील लोकसभा निवडणूक व उमदेवार याचे चित्र तीन-चार दिवसांत स्पष्ट होईल, उमेदवारी व राजकीय भूमिका याबाबत जे अधिकृत सांगायचे आहे, ते 31 मार्च पर्यंत सांगणार आहे, नव्या राजकारणाची सुरुवात कशी असेल आपल्या पुढे मांडले जाईल. राजकीय स्तरावर नाही परंतू गावपातळीवर वेगळ्या घडामोडी सुरु आहे. त्यामुळे दोन-तीन दिवसांत राज्यातील राजकीय समीकरण आपल्या समोर येणार आहे. राज्यात काय परिस्थिती आहे व काय उद्भवतंय हे आपल्या पुढे आहे, त्यामुळे चार दिवसांत वातावरण अधिक स्पष्ट झाल्यानंतर आपली भूमिका मांडणार असल्याचे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुण्यात महाविकास आघाडी कडून काॅंग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर तर महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे उमेदवार असताना वसंत मोरे यांची प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने मोरे यांना वंचित कडून उमेदवार मिळेल का याकडे लक्ष लागून आहे.