नाशिक । लोकसभा जागेच्या वाटपावरुन महायुतीच्या वादाचा तिढा वाढतच चालला असून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी दिल्लीचा हवाला देत दावा केला, यावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खंडन केले असून ट्विस्ट वाढले आहे. दरम्यान उमेदवारी जाहीर होण्यापुर्वी शिवसेनेचे विद्यमान खा. हेमंत गोडसे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबई येथील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या जागेवरुन चर्चा करण्यात आली. महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी नाशिकच्या जागेवर दावा केल्याने राजकीय गुंता वाढला आहे. यामुळे नाशिक मध्ये कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तर उमेदवारी वरुन इतर दोन पक्षांतील इच्छुक व त्यांच्या समर्थकांमध्ये झालेली नाराजी दूर करण्यात तिन्ही पक्षांच्या नेत्यांना नाकीनऊ येणार आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ,नेते भाऊसाहेब चौधरी, आ. सुहास कांदे आदींनी खा. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिल्याने खा. हेमंत गोडसे शनिवार पासून प्रचाराला लागले आहे. नाशिक मधून खा. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागून आहे.