नाशिक । महायुतीकडून नाशिक लोकसभेच्या उमेदवारी कोणत्याही क्षणी घोषित होऊ शकते अशी परिस्थिती असताना मंत्री छगन भुजबळ यांची प्रबळ दावेदारी असताना त्यांच्या उमेदवारीला भाजप व काही मराठा समाजाकडून विरोध होत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिका-यांनी राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे यांच्या उमेदवारीची मागणी केली आहे. दरम्यान, अरिंगळे यांना उमेदवारी मिळाली नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा इशारा कोरडे यांनी दिल्याने नवा ट्विस्ट तयार झाला आहे.
नाशिकरोड विभागाचे अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी मंगळवारी (दि.9) रोजी सकाळी पत्रकार परिषद घेतली, यावेळी कोरडे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भूमिका स्पष्ट केली. कोरडे म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या कोट्यातून राष्ट्रवादी पक्षा साठी जागा सुटलेली असताना मंत्री छगन भुजबळ यांचे नाव निश्चित झाले आहे, मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजप व मराठा समाजाच्या काही संघटनांनी विरोध केल्याने मिळालेली जागा अडचणीत येवू नये म्हणून मराठा समाजातील राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे याना उमेदवारी घोषित करावी, गेल्या कित्येक वर्षांपासून ते सक्रीय राजकारणात असून दि. नासिकरोड देवळाली व्यापारी बॅंकेचे संचालक आणि अनेकदा चेअरमन झालेले आहेत, लोकसभेच्या कार्यक्षेत्रातच व्यापारी बॅंकेच्या 26 शाखा आहेत, लोकसभा मतदारसंघात बॅंकेचे 77 हजार सभासद व सुमारे एक लाख खातेदार असल्याने अरिंगळे यांना मोठे पाठबळ मिळेल. सिन्नर मधून आ. माणिकराव कोकाटे व देवळाली मतदारसंघात आ. सरोज अहिरे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्याच प्रमाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाची मोठी ताकद आहे.
कोरडे म्हणाले की, महायुतीचे उमेदवार म्हणून अरिंगळे यांना उमेदवारी जाहीर करावी अन्यथा निवडणुकीत वेगळी भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. यावेळी वसंत अरिंगळे, जगदीश पवार, विक्रम कोठुळे, वाल्मिक बागूल, विनोद देशमुख, भाऊसाहेब खालकर, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, मंगेश लांडगे, ताहीर शेख, मनिष हांडोरे, सुनील महाले, आदी उपस्थित होते.