नाशिक । इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मध्ये शनिवार दिनांक २० जुलै रोजी मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन महत्त्वाच्या त्रैवार्षिक निवडणुका होत असून दोन्ही प्रेस मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान मजदूर संघाच्या अध्यक्षपदी जयवंत भोसले यांची बिनविरोध निवड झाली असून उर्वरित मतदानाला काही तास शिल्लक आहेत, यामुळे दोन्ही पॅनलकडून वैयक्तिक भेटीगाठींवर भर दिला जात आहे.
कामगार पॅनलचे नेते जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे, राजेश टाकेकर यांच्या नेतृत्वाखाली मजदूर संघ गेल्या बारा वर्षांपासून कामगार हिताच्या प्रश्नासाठी लढत असून यंदाही ही निवडणूक कामगार हिताच्या मुद्यावरच लढविली जात आहे. कामगार पॅनलने कामगारांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यात मयत कामगारांच्या वारसांना नोकरी, कामगारांच्या प्रश्नावर व्यवस्थापनाकडून न्याय मिळवून देण्याचे काम केले. या निवडणुकीत कामगार आमच्या पाठीशी खंबीर उभे राहतील असा विश्वास पॅनलचे नेते जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी व्यक्त केला.
इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट मधील प्रेस मजदूर संघाच्या एकूण २९ तर वर्क्स कमिटीच्या एकूण २४ जागांसाठी दोन्ही प्रेस मध्ये निवडणुका उद्या शनिवारी (दि.20) रोजी होत आहेत. सुमारे अठराशे कामगार असलेल्या दोन्ही प्रेसमध्ये या दोन निवडणुका होणार आहे. मजदूर संघ व वर्क्स कमिटी या दोन निवडणुका महत्वाच्या मानल्या जातात.
शनिवार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळात होणार मतदान होणार असून त्यापैकी मजदूर संघाची मतमोजणी रविवारी (दि.21) सकाळी आठ वाजता सुरू होईल व सायंकाळी सहा वाजेपर्यंत पूर्ण निकाल हाती येण्याची शक्यता आहे तर वर्क्स कमिटीची मतमोजणी सोमवार दिनांक २२ जुलै रोजी होणार आहे. दरम्यान दोन्ही प्रेस मध्ये पारंपारिक पद्धती नुसार कामगार पॅनल व आपला पॅनल मध्ये सरळ लढत होणार आहे दोन्ही पॅनलच्या वतीने सर्व जागा लढविण्यात येत असून आपला पॅनलचे नेतृत्व हरिभाऊ ढिकले व किरण गांगुर्डे हे करत आहे