श्रीधर गायधनी । नाशिक – 8888856677
शिवजन्माचा हलवा पाळणा या कार्यक्रमाला, प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख किर्तनाला महिलांची अलोट गर्दी होती, विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन, दत्ता गायकवाड, आ.सरोज अहिरे, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे आदींकडून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संपुर्ण शहर भगवेमय झाले असून दोन दिवसांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने सोहळा होत असून 18 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपुर्ण शहरात रोषणाई, भगवे झेंडे, स्वागत व शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहे.
रविवारी संध्याकाळी प्रसिद्ध किर्तनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख(इंदुरीकर) यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते, यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, बाळासाहेब म्हस्के, सुनील पाटोळे, नितीन पाटील, मंगेश पगार, संदीप वाळके, जयेश अरिंगळे, आदींनी स्वागत केले, किर्तनाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रविवारी रात्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डाॅ. बारी, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, प्रमोद वाघ, राजू पाचोरकर, आदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्ताचा आढावा घेतला, बंदोबस्तासाठी अडीचशे पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांची नियुक्ती करण्यातआली आहे.
शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रविवारी रात्री अकरा वाजता झुलवा पाळणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ओझर येथील पथकाने पथनाट्याच्या माध्यमातून शिवरायांच्या जन्म व इतर गीते सादर केली, या कार्यक्रमाला महिलांनी पाळणा गीते सादर केली. रविवारी रात्री किर्तन संपल्यानंतर परिसरातील विविध मंडळांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर शिवप्रेमींनी जल्लोष केला, रात्री बारा वाजेला फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
सोमवारी (दि.19) सकाळी असंख्य महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.महिलांनी पुतळ्यासमोर रांगोळी काढणे, फुगडी खेळणे, झेंडे फिरवणे, गीते सादर केली, महिलांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सेल्फी काढण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती.
येथील उड्डाणपुलाखाली शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिर व मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आदींच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी दत्ता गायकवाड, आ. सरोज अहिरो, माजी आमदार योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे, नामको हॉस्पिटल, करन्सी नोट प्रेस, लोक संकल्प केमिस्ट ग्रुप यांच्यासह डाॅ. सुशांत राजेंद्र जाधव व डाॅ. अमोल सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात तपासणी सुरु होती.
शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून व्यावसायिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी शिवउद्योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, देवळालीच्या आ. सरोज अहिरे, माजी नगरसेविका संगिता गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. याठिकाणी फास्ट फूड सह इतर खाद्य पदार्थ थंड पेय व उसाच्या रसाचे स्टाॅल लावण्यात आले आहे,या महोत्सवाला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.