नाशिक । येथील अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक अशोक नजन (40) यांनी आपल्या सर्विस रिव्हाॅलवर मधून आपल्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह वरीष्ठ पोलीस अधिकारी व पथकाने अंबड पोलीस ठाण्याला भेट दिली.
मंगळवारी (दि.20) सकाळी अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अशोक नजन हे ड्यूटीवर हजर झाले होते, त्यानंतर सकाळी रोजच्या प्रमाणे रोल काॅल साठी प्रांगणात पोलीस कर्मचारी थांबलेले असतांना निरीक्षक नजन हे बाहेर का येत नाही, हे बघण्यासाठी त्यांच्या कक्षाकडे गेलेल्या पोलीस कर्मचारी यांना अशोक नजन हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहायला मिळाले, काल शिवजयंती निमित्त रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त करुन घरी गेल्यानंतर आज सकाळी पुन्हा ड्युटीवर आलेले नजन यांनी आत्महत्या का केली याचा तपास केला जात आहे. नजन यांच्या आत्महत्येमुळे पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.