नाशिक । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, बारस्कर यांच्या भूमिकेवर प्रहार पक्षाने बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटने मधून बडतर्फ करण्यात आल्याचा पक्षादेश काढण्यात आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात सोबत असलेले अजय बारस्कर यांनी जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहे, त्यावर प्रहार जनशक्ती पक्षाने बारस्कर यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली असून आ. बच्चू कडू यांनी पक्षादेश काढला आहे, आ. कडू यांनी सदर पक्षादेश ट्वीट करुन प्रसिद्ध केला आहे.
आ.कडू यांनी काढलेल्या पक्षादेशात म्हटले आहे की, पक्षामध्ये कोणीही श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या मराठा आरक्षणाविषयी किंवा इतर आरक्षण किंवा नेत्याबद्दल कोणतीही भूमिका मांडू नये, असे केल्यास त्या व्यक्तीचा प्रहार जनशक्ती पक्षाशी काहीही संबध राहणार नाही. पक्षाची अधिक-त भूमिका पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चू कडू हेच स्वतः मांडतील, इतर कोणीही अध्यक्षांच्या मान्यतेशिवाय आपली भूमिका मांडू नये, आज दिनांक 21/2/2024 रोजी अजय महाराज बारस्कर यांनी जरांगे पाटील यांचेविषयी जी भूमिका मांडली त्या संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष किंवा प्रहार वारकरी संघटना समर्थन करत नाही किंवा काहीही संबध नाही.
तरी अजय महाराज बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटनेमधून बडतर्फ करण्यात येत आहे. त्यांचा पक्षाशी आजपासून काहीही संबध राहणार नाही असा पक्षादेश काढण्यात आला असून तसे ते प्रसिद्ध करण्यात आले आहे.