श्रीधर गायधनी । नाशिक
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात हजारो शिवभक्तांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करत जल्लोष साजरा केला, शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवभक्तांचे स्वागत करण्यात आले पारंपारिक वेशभुषा करत हजारो महिलांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
संपुर्ण महाराष्ट्रात आदर्श ठरलेल्या नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक व जेलरोड भागातील सैलानी बाबा चौकात पाच दिवसीय सोहळा होत असून 18 ते 22 फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संपुर्ण शहरात रोषणाई, भगवे झेंडे, स्वागत व शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहे. सोमवारी (दि.19) सायंकाळी महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 125 च्या मैदानावरुन जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणुक काढण्यात आली, मुक्तीधाम परिसरातून बिटको मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाण्यासाठी तब्बल तीन तास मिरवणुक चालली होती.
शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, बाळासाहेब म्हस्के, सुनील पाटोळे, नितीन पाटील, मंगेश पगार, संदीप वाळके, जयेश अरिंगळे, आदीसह शिवजन्मोत्सव समितीचे सर्व जेष्ठ सभासद, माजी अध्यक्ष यांनी प्रमुख पाहुण्यांचे व शिवभक्तांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डाॅ. बारी, यांनी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. रविवारी रात्री अकरा वाजता झुलवा पाळणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख यांचे किर्तन संपल्यानंतर विविध मंडळांकडून मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोर शिवप्रेमींनी जल्लोष केला, रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान शिवाजी भागवत फ्रेंड सर्कल व शिवशाही प्रतिष्ठाण आदी मंडळांच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी (दि.19) सकाळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले, येथे रक्तदान शिबिर व मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले, शिबिराचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे आदींच्या हस्ते करण्यात आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, बबनराव घोलप, विजय करंजकर, दत्ता गायकवाड, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, आ.सरोज अहिरे, आ. राहुल ढिकले, प.पू. शांतीगिरी महाराज, सुधाकर बडगुजर, माजी आ. योगेश घोलप, निवृत्ती अरिंगळे, अजय बोरस्ते, प्रशांत दिवे, शिवाजी भोर, जगदीश गोडसे, सूर्यकांत लटवे, संगिता गायकवाड, आदी हजारो शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. नामको हॉस्पिटल, करन्सी नोट प्रेस, लोक संकल्प केमिस्ट ग्रुप यांच्यासह डाॅ. सुशांत राजेंद्र जाधव व डाॅ. अमोल सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिरात तपासणी सुरु होती. शिव उद्योग महोत्सवातून फास्ट फूड स्टॉल उभारण्यात आले आहेत.