सलग दोन वेळा शिवसेनेचा खासदार निवडून दिलेला नाशिक लोकसभा मतदारसंघ यंदा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेचा समजला जात आहे, त्यामुळे शहरावर चांगली पकड असलेल्या बजगुजर यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी टाकल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बडगुजर यांना ग्रामीण भागावर अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
नाशिक । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठे फेरबदल करण्यात आले असून जिल्हाप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची तर महानगरप्रमुख पदी विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आहे. ठाकरेगटाकडून लोकसभेचे संभाव्य उमेदवार करंजकर यांना एकप्रकारे ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकात माजी जिल्हाप्रमुक विजय करंजकर यांना लोकसभा संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत जबाबदारीचे समजले जाणारे जिल्हाप्रमुख पदावर माजी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तर महानगरप्रमुख पदावर विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप च्या वतीने नाशिकची जागा लढविण्याचा प्रयत्न आहे, मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खास समजले जाणारे विद्यमान खा. गोडसे यांनी प्रचार सुरु केला आहे. महायुतीकडून भाजपचा उमेदवार देण्यासाठी स्थानिक नेत्यांची थेट दिल्ली दरबारी आग्रही भूमिका दिसून येत आहे. लोकसभा मतदारसंघातील एकुण सहा विधानसभा पैकी शहरात तीन भाजपचे आमदार असून सिन्नर व देवळाली मतदारसंघात अजित पवार गटाचे दोन आमदार आहे, एकमेव इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा काँग्रेसच्या हाती आहे. त्यामुळे महायुतीचा खासदारच निवडून येईल असे गणित मांडले जात आहे, त्यामुळे भाजपकडून दिनकर पाटील, अॅड. नितीन ठाकरे व आ. राहूल ढिकले यांच्या नावाची चर्चा आहे.