नाशिक । केंद्रात पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्तात 2024 च्या निवडणूकीत भाजपने 400 पार चा नारा दिला असताना अमरावतीच्या भाजप उमेदवार खा. नवनीत राणा यांनी प्रचारसभेत मोदींची हवा आहे म्हणून आपण सहज सहज निवडून येऊ या फुग्यात कोणीही राहू नका असे जाहीररित्या वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा घेऊन भाजप देशात सत्ता स्थापनेसाठी 400 पार चा नारा दिला आहे, तर महाराष्ट्रात 45 प्लस चा नारा दिलेला आहे, त्यासाठी भाजपचे सर्वच नेते, पदाधिकारी अहोरात्र कष्ट घेत आहे, असे असले तरी लोकसभा उमेवदारी वरुन राज्यात अनेक जागांवर महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेच्या मातोश्री समोर हनुमान चालिसा वरुन चर्चेत आलेल्या अपक्ष खा. नवनीत राणा यांना अमरावती मधून भाजपने यंदा उमेदवारी दिली आहे.
अमरावतीत नवनीत राणा यांनी प्रचाराला धडाक्यात सुरुवात केलेली आहे. अमरावतीत एका प्रचार सभेतून खा. नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून चक्क पंतप्रधान मोदींवरच केलेल्या एका विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत, खा. राणा म्हणाल्या की, ही निवडणूक ग्रामपंचायती सारखी निवडणूक म्हणून लढत आहे, जर कोणी भ्रमात राहत असाल की, मोदींची हवा आहे, तर लक्षात ठेवा 2019 जेव्हा मोदींची लाट असताना मी अपक्ष म्हणून निवडून आली होती, अशा परिस्थितीत मी अपक्ष खासदार झेंडा गाडून गेली होती, असे वक्तव्य केल्याने राजकीय खळबळ उडाली असून भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र आहे.