नाशिकरोड । येथील एकलहरे रोड वर पहाटेच्या सुमारास झाडावर भरधाव कार आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून तीन जण जखमी झाले असून जखमींना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित राजेंद्र रणशूर (34) असे मृत व्यक्तीचे नाव असून औष्णिक वीज केंद्रातील कर्मचारी असल्याचे समजते.
पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे रोड वरील गवळी बाबा मंदिरा जवळ बुधवारी (दि.6) पहाटेच्या सुमारास एकलहरे कडे भरधाव वेगाने जाणारी कार (एमएच 14 सीसी 9632) रस्त्याच्या बाजूला असेलल्या निलगिरीच्या झाडांवर आदळून अपघात झाला, कारचा वेग इतका होता की, कार झाडावर आदळून पुन्हा रस्त्यावर आली होती. या अपघातात रोहीत राजेंद्र रणशूर (34) वर्षे, मोहिते गॅरेज मागे, अरिंगळे मळा, नाशिकरोड हा मृत झाला असून इतर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरु आहे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली, मृत रोहीत रणशूर हा एकलहरे औष्णिक वीज केद्रातील कर्मचारी असल्याचे समजते. इतर तिघांची प्रकृती साधारण असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र जखमींची नावे अद्याप माहित नसल्याचे ठाणे अंमलदार यांनी सांगितले. दरम्यान कार मध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्याची चर्चा होती.