Blog

महायुती । शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी

नाशिक । नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत प्रचंड रस्सीखेच सुरु असून शिवसेना भाजप व राष्ट्रवादी पक्षाचे नेते, पदाधिकारी उमेदवारीसाठी आपापल्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असे असले तरी महायुतीच्या अंतर्गत वादातून महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची काळजी घेत कोणत्या पक्षाला तिकीट दिले जाणार यावर महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे, दरम्यान, काही तासात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा होणार असून सध्या नाशिक मध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र आहे. 

नाशिक मधून दोन वेळा खासदार हेमंत गोडसे यांच्या नावाला खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगून गोडसे यांच्या उमेदवारीला हिरवा झेंडा दाखवला असून अधिकृत घोषणा बाकी आहे. असे असले तरी भाजप व राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवर दावेदारी सुरु केल्याने महायुतीत तणावाचे वातावरण आहे.

नाशिकच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने नाशिकच्या जागेवर केलेल्या दाव्यानंतर शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारी बाबत कार्यकर्त्यांमध्ये वाढलेल्या शंका दूर करण्यासाठी  रविवारी (दि.24) रात्री साडे दहा वाजता नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी, आ. सुहास कांदे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख बंटी तिदमे, गणेश कदम, नितीन खर्जुल, हरिष भडांगे, विनायक आढाव, लकी ढोकणे, आदींसह शेकडो कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना विश्वास देत, नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून खा. हेमंत गोडसे यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण होते. यावेळी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते. 

दरम्यान भाजप मुळे झालेल्या शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे हे भाजप नेत्यांचे फोटो लावत नसल्याचे कारण सांगत भाजप ने नाशिकच्या जागेवर दावा केला असून भाजपचे इच्छुक दिनकर पाटील, केदा आहेर, आदींसह भाजपचे आ. सीमा हिरे, आ. देवयानी फरांदे, आ.राहुल ढिकले मुख्य पदाधिकारी यांनी सोमवारी (दि.25) सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकच्या जागेवर दावा करत अन्नत्याग करण्याचा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

राष्ट्रवादीने दावेदारी करताना मंत्री छगन भुजबळ यांचे नाव पुढे येत असून व्यापारी सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक व राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी दावेदारी केल्याने वाद चिघळण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदे गटाकडून काही तासात उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याने नाशिकच्या जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *