नाशिक । महायुती कडून नाशिक मधून उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत असला तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरुच ठेवला आहे, एका बाजूला उमेदवारीसाठी धडपड सुरु असताना व उमेदवारी बाबत अनिश्चितता असताना दुसरीकडे गोडसे यांचे हजारो कार्यकर्ते प्रचारात सहभागी होऊन शहरासह, सिन्नर, इगतपुरी व पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील वाड्यापाड्यासह मतदारसंघात प्रचाराची दुसरी फेरी पुर्ण झाली आहे.
भाजपने 400 पार चा नारा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हवेत आपण निभावून जावू या भोळ्या आशेवर गल्लीभर आवाका असलेल्या नेत्यांना ग्रामपंचायत किंवा नगरपालिका सारखी निवडणूक वाटायला लागल्याचे चित्र आहे, जे लोक कधी विधानसभा निवडणूकीला सामोरे गेले नाहीत असे अनेक चेहरे मोदी लाटेत आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न करत आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेचा हक्क असताना भाजप व राष्ट्रवादीने दावे केल्याने दोन वेळा निवडून आलेले खा. हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचे चित्र नाशिक मध्ये होते. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी आश्चर्यकारक निवडणुकीतून माघार घेतल्याने नवा पेच निर्माण झाला आहे, असे असताना गोडसे यांच्याकडून प्रचार पुन्हा जोमाने सुरु करण्यात आला आहे. हजारो कार्यकर्ते मतदारसंघात घरोघरी जावून खा. हेमंत गोडसे व महायुतीची भूमिका मांडत आहे, प्रचार पत्रके व स्टीकर यांचे वाटप केले जात आहे. शिवसेनेच्या पदाधिका-यांकडून भेटीगाठी व बैठकांवर जोर देण्यात आला आहे.
असे असताना एका बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे, सभा, बैठकांवर चांगलाच जोर सुरु आहे, असे असताना उबाठा गटाचे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे नाराज होऊन मुख्यमंत्री शिंदे गटाच्या संपर्कात असल्याने वाजे यांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, उबाठा गटाकडून करंजकर यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.