आ.सरोज आहिरे यांनी विधीमंडळात लक्षवेधीद्वारे आरक्षणाची केली मागणी, मराठा समाजाला बहुजनांच्या समर्थनाची खरी गरज
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण देण्याची हीच वेळ असून कायद्याच्या चौकटीत राहून मराठा आरक्षण द्यावे अन्यथा पुढील पिढी लोकप्रतिनिधींना कधीही माफ करणार नाही. मराठा समाजाच्या भावना समजून आम्ही त्यांच्या पाठीशी असून मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे सांगत देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आ. सरोज आहिरे यांनी विधीमंडळात लक्षवेधीद्वारे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून देवळाली विधानसभेच्या आ.अहिरे यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी लक्षवेधी मांडली, यावेळी बोलतांना आ.अहिरे म्हणाल्या की, महाराष्ट्रात सर्व जाती धर्म चा मोठा भाऊ म्हणून आजतागायत मराठा समाजाने भूमिका बजावलेली आहे. मराठा समाजाला सर्व बहुजनांच्या समर्थनाची खरी गरज असून आरक्षण देण्याची हीच खरी वेळ आहे. 1982 साली मराठा आरक्षणासाठी दिवंगत माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी मोर्चा काढला होता. त्यामुळे आरक्षणाची मागणी जुनी आहे. 1902 मध्ये आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या राज्यातील सरकारी नोकरीत मागासवर्गीयासाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. छत्रपती शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातले लोकप्रतिनिधी आहोत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आरक्षणासाठी सकारात्मकतेने प्रयत्न होत असताना काही समाज विघातक प्रवृत्ती न्यायालय जातात आणि मराठा आरक्षण रद्द करण्यासाठी खटले दाखल करतात. अशा मनोवृत्तीच्या लोकासोबत चर्चा करुन सकारात्मक निर्णय होणे आवश्यक आहे असल्याचे आ. अहिरे यांनी सांगितले.
छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदारांना व संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. त्याच महाराष्ट्रात आज जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होत आहे. ओबीसी- मराठा बांधव एकमेकांकडे तिरक्या नजरेने पाहत असून महाराष्ट्राला हे अशोभनीय असल्याचे आ. सरोज आहिरे यांनी म्हटले.
इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण हवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन राजर्षी शाहू महाराजांनी उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं आणि खरोखरच मराठा समाजाचे ऋण फेडायचे असेल तर आज एक मागासवर्गीय आमदार म्हणून बहुजन समाजाने मराठा समाजाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. आज आरक्षणाची इतकी गरज का भासत आहे की ज्यासाठी 58 मूक मोर्चे शांततेने काढले. पूर्वी जास्तीत जास्त भू धारक शेती करणारा मराठा समाज होता परंतु परिस्थिती नुसार कर्जबाजारी इतर कारणांमुळे अल्पभूधारक समाजाला आरक्षणाची नितांत गरज असल्याचे आ.अहिरे यांनी सांगितले.
आरक्षण न मिळाल्याने मराठा समाजाची मोठी वाताहात
अवकाळी पावसाने द्राक्ष, सोयाबीन, कापुस, कांदा सर्व शेती पिकांचे नुकसान झाले. अशा परिस्थितीमध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात. परंतु दुधाला शासनाचा 34 व 35 रुपये भाव द्यायला देणे गरजेचे असताना 22 रुपयांचे दर मिळत आहे. शेतक-यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. वीस जागांची भरती निघाली तर दहा दहा हजार अर्ज येत असल्याची स्थिती आहे. मराठा समाज शिक्षण घेऊन कुठेतरी आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतो, परंतू नोकरीमध्ये आरक्षण नसल्यामुळे या समाजाची मोठी वाताहात झाल्याचे आ. सरोज अहिरे यांनी सांगितले.