नाशिक । श्रीधर गायधनी
केंद्र शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी तातडीने मागे घेऊन मेटाकुटीला आलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा ,अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरद पवार गटाने विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना दिले. यावेळी शिष्टमंडळाने शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.
केंद्र सरकारने मागील पंधरा दिवसापासून कांद्यावर निर्यात बंदी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना विदेशात कांदा पाठविता येत नाही. अनेक क्विंटल कांदा बंदरावर पडून आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. तसेच कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे देशात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे कांद्याला बाजारात योग्य भाव मिळत नाही. एकीकडे निसर्गाचा कोप आणि दुसरीकडे कवडीमोल दराने मिळणारे बाजारभाव यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलेला आहे.
कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी विविध पतसंस्थेकडून मोठया प्रमाणात कर्ज घेतले आहे. निर्यातबंदीने कांद्याला बाजार भाव मिळत नाही, परिणामी कर्जाची परतफेड करणे देखील शेतकऱ्यांना शक्य होत नाही, शेतकऱ्यांची मुद्दल देखील वसूल होत नाही . केंद्र शासनाने याविषयी तातडीने दखल घेऊन कांद्यावरील निर्यातबंदी उठवत सामान्य शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ,अशी मागणी असलेले निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी यांच्या नेतृत्वाखाली विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांना देण्यात आले.याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस दिनेश धात्रक, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तुषार जाधव, युवक जिल्हाध्यक्ष शामराव हिरे, चांदवड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वाकचौरे, नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, दिंडोरी तालुकाध्यक्ष सागर गुंबार्डे, वैभव धांडे आदी उपस्थित होते