Blog

चार ‘तरुणांची’ सायकलवरून नर्मदा परिक्रमा

नाशिक । देवळाली कॅम्प जवळील शिंगवे बहुला गावातील चार जेष्ठ नागरीकांनी सायकल वरून नर्मदा परिक्रमा सुरु असून 17 दिवसात तरुणांना लाजवेल असे सुमारे 1800 किलोमीटर अंतर सायकल वरुन पार केले आहे. त्यापैकी पाच दिवस अत्यंत खडतर व जंगल भागातून प्रवास केला असून सरासरी रोज 80 ते 90 किलोमीटर अंतर पार केले जात आहे. सध्या ते मध्यप्रदेश मधील उदयपुरा येथून पुढील परिक्रमेला निघाले आहे.

तालुक्यातील शिगवे बहुला येथील शाळकरी मित्र असलेले शंकर क्षीरसागर (63), तुळशीराम पाटोळे (63), कोंडाजी डांगे (67), बाळासाहेब गवळी (63) यांनी नर्मदा परिक्रमेला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर  सायकल ने ओंकारेश्वर गाठले, नर्मदा परिक्रमा प्रारंभ 12 जानेवारी रोजी केला, परिक्रमेसाठी आवश्यक  तसेच सायकलच्या किरकोळ दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य सोबत घेतले आहे. 17 दिवसांत एकुण 1800 किलोमीटर अंतर पार केले आहे. 

गुजराथच्या पश्चिम भागात नर्मदा काठच्या खप्पर माळ, मोगली, शूल पाणी परिसरातून पायी जाता येत नाही, दाट जंगल व दलदलीचा प्रदेश आहे, या भागातून सायकल घेऊन बाहेर पडण्यासाठी तब्बल पाच दिवस लागल्याचे बाळासाहेब गवळी यांनी सांगितले, ते पुढे म्हणाले की, दरवर्षी आम्ही पंढरपूरच्या वारीत तब्बल महिनाभर पायी चालतो, नर्मदा परिक्रमा केल्याने फिटनेस वाढतो, मोकळ्या व निसर्गरम्य वातावरणात रोज नकळत व्यायाम होत असल्याने वर्षातील उर्वरीत दहा महिने आम्हाला कोणताही आजार स्पर्श करत नाही. तरुणाईने यापासून धडा घेतला पाहीजे असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला आहे. कोंडाजी डांगे म्हणाले की, यापुर्वी मी दोन वेळेस पायी व दोन वेळेस सायकल वरुन नर्मदा परिक्रमा केलेली आहे, तो अनुभव कामी आला असून नियोजित ठिकाणी जेवण व परिक्रमेत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम केल्याने कोणतीही अडचण येत नाही, मी 16  वेळेस अमरनाथ, केदारनाथ, बद्रीनाथ ची 45 दिवसांची 1450 किलोमीटर अंतराची परिक्रमा केलेली आहे, गोवर्धन पर्वताची 12 दिवसांची 1200 किलोमीटर अंतराची परिक्रमा केलेली आहे. त्यामुळे हे अंतर सायकल वरुन सहज वाटते असल्याचे डांगे म्हणाले.

तुळसीराम पाटोळे म्हणाले की, आम्ही वर्गमित्र असल्याने गप्पागोष्टी व नामस्मरणात रोज सरासरी 90 किलोमीटर अंतर सहज पार होत असते, अद्याप पर्यंत सायकली आमच्या प्रमाणेच तंदुरुस्त असल्याने किरकोळ अपवाद वगळता कोणताही खोळंबा झालेला नाही, विशेष म्हणजे 1800 किलोमीटर अंतर चालून आलो तरी सायकल च्या टायर मधील हवा कमी झालेली नाही. शंकर क्षीरसागर यांनी परिक्रमा मार्ग व त्यावरील ठिकाणांची माहिती दिली, ते म्हणाले की, परिक्रमेला ओंकारेश्वर पासून सुरुवात केली, त्यानंतर पहिला मुक्काम तेली भट्टीयान येथे झाला, अंजड, बोकराटा, अंगड, नेत्रांग, विमलेश्वर येथून बोटीतून समुद्र पार करुन मिठ्ठीतलाई, भरुच, कुबेर भंडारी, छोटी अंबाजी शेजारी गटांबे, नंतर मध्यप्रदेश सोंडवा येथे मुक्काम केला, करोली, गुजरी, बरजर, परिक्रमेचे मध्य स्थान असलेल्या कांटाफोड, चिपानेर, शहागंज, उदयपुरा येथे मुक्काम केल्या नंतर सोमवारी (दि.29) रोजी तब्बल 105 किलोमीटर प्रवास केला आहे. प्रवासात घाट रस्ते, नदी किनारी असलेले कच्चे रस्ते, दलदल त्यामुळे थोडी कसरत होते, परंतू सुमारे 3500 किलोमीटर अंतराची परिक्रमा सायकल वरुन करणे एक वेगळाच अनुभव असल्याचे क्षीरसागर म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *