नाशिक । राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची निफाड येथे सभा आयोजित केलेली आहे, या पार्श्वभूमिवर निफाड तालुक्यात अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो बॅनर वर लावल्याने शरद पवार गटाकडून पोलिसांत तक्रार अर्ज दिल्याने राजकारण तापले आहे.
शरद पवार गटाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची निफाड येथे 13 मार्च रोजी जाहीर सभा होत असून त्या निमित्त सभेची जोरदार तयारी सुरु आहे. या सभेला महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, उपस्थित राहणार आहे. विरोधी गटाकडून फोटो वापरू नये असे पवार साहेबांनी सांगितलेले आहे, असे असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी पवार साहेबांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत.
आ. दिलीप बनकर यांनी शरद पवार यांच्या स्वागताचे लावलेल्या बॅनर वरुन राजकारण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भुषण आबाजी शिंदे यांनी बनकर यांनी लावलेला बॅनर वरील फोटो तात्काळ काढण्यासाठी निफाड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.