नाशिक । विधानसभेची निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे, महायुती व महाविकास आघाडीच्या कडून आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे, मात्र, नाशिक पूर्व मधून महायुतीचे संभाव्य उमेदवार व विद्यमान आमदार राहूल ढिकले यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून इच्छूक असलेले कामगार नेते जगदीश गोडसे यांंनी घरोघरी प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान गोडसे यांनी शरद पवार यांची भेट घेत मतदारसंघात प्रचारासाठी तयार केलेले परिचय पत्रक पवार यांना दिल्यानंतर पवार यांनी समाधान व्यक्त केले, यावेळी पुढील रणनिती बाबत गोडसे यांना काही सूचना दिल्याचे समजते.
नाशिक पूर्व मधून महायुतीकडून भाजपचे आमदार राहूल ढिकले हेच प्रबळ दावेदार असून आ.ढिकले यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून सक्षम उमेदवार म्हणून प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांच्या नाव जवळपास निश्चित समजले जात आहे, गेल्या दीड वर्षापासून जगदीश गोडसे हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या संपर्कात असून गोडसे यांच्या विविध कार्यक्रमाला खुद्द पवार यांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी चा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने देवळाली पाठोपाठ नाशिक पूर्व वर दावेदारी केल्याने जगदीश गोडसे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
दरम्यान, कामगार नेते जगदीश गोडसे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली, यावेळी गोडसे यांनी आपल्या कामाचे परिचय पत्रक शरद पवार यांना दिले. यावेळी पवार यांनी गोडसे यांची निवडणूकीची तयारी समजून घेतली.
.नाशिक पूर्व मधून महाविकास आघाडी कडून उमेदवारी साठी प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी घरोघर प्रचार सुरु केला असून, विधानसभा मतदारसंघात प्रचार करणारे गोडसेंचे सहकारी, प्रेस कामगार व समर्थकांचा सहभाग दिसून येत आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक पूर्व मधून लोकसभा निवडणुकीत महायुतीचे हेमंत गोडसे यांना 100311 तर महाविकास आघाडीचे खा. राजाभाऊ वाजे यांना 89911 मते पडलेली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीची क्षमता दिसून आली आहे, पूर्व मतदारसंघात सिन्नर तालुक्यातील सुमारे 41 हजार मतदार असल्याचे बोलले जाते त्यामुळे येत्या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत खा. राजाभाऊ वाजे यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
गेल्या पंचवार्षिक लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माजी खासदार हेमंत गोडसे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे जगदीश गोडसे हे दोन वर्षापासून हेमंत गोडसे यांचे पासून राजकीय पटलावर अंतर ठेवून आहेत.तेव्हापासून गोडसे हे महाविकास आघाडीत सक्रिय झाले आहे, जगदीश गोडसे यांच्या वाढदिवस व वास्तूशांती कार्यक्रमाच्या निमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आपल्या घरी निमंत्रित केले होते. तेव्हा पासूनच गोडसे यांच्या उमेदवारीबाबत मतदारसंघात चर्चा सुरु झाली होती, लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निवडणुकीत जगदीश गोडसे व कामगारांची भूमिका महत्वाची ठरली होती.