नाशिक रोड । राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीने ‘आर आर (आबा) पाटील सुंदर गाव 2023-24’ पुरस्कार तालुक्यातील लहवित गावाला मिळाला असून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्री दादा भुसे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.अर्जुन गुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
लहवित ग्रामपंचायतला सण 2023-24 या वर्षाचा स्मार्ट ग्राम तथा स्वर्गीय आर आर आबा सुंदर गाव पुरस्कार तालुकास्तरीय प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार प्राप्त करताना ग्रामपंचायतीने खालील बाबींवर कामकाज केलेले आहे.
गावातील कुटुंबसंख्येच्या प्रमाणात लोकांकडे वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय आहेत. व त्याचा नियमित वापर होतो. गावातील सर्व सार्वजनिक इमारतींना वैयक्तिक शौचालयाची मुतारीची व्यवस्था करण्यात आलेली आहे .गावातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी भूमिगत गटार हे काम 70 टक्के झालेले असून 30 टक्के काम प्रगतीपथावर आहेत.घनकचरासाठी ग्रामपंचायत मार्फत घरोघरी जाऊन कचरा गाडी (घंटा गाडी) द्वारे कचरा संकलन करण्यात येतो, तसेच गावात ग्रामपंचायत कार्यालय व्यायाम शाळा तलाठी कार्यालय आरोग्य उपकेंद्र ,आरोग्य केंद्र, विकास सोसायटी कार्यालय बँक प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा अंगणवाडी ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज अशी इमारती आहेत. एकूण 73 इतके बचत गट असून बचत गटात मार्फत महिलांना विविध लघु उद्योगांसाठी बँकांनी कर्ज दिलेले असून बचत गटांचे उत्तम प्रकारे कामकाज सुरू आहे. गावात प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कर भरणे बाबत क्यू आर कोड प्रणाली विकसित केलेले असून क्यू आर कोड द्वारे गावातील नागरिक ग्रामपंचायत कराचा भरणा करू शकता, गावातील सर्व पथदिव्यांवर एलईडी लाईट बसवण्यात आलेले आहे . त्यामुळे ऊर्जा बचत होते .सामाजिक दायित्व म्हणून ग्रामपंचायतीने महिला बालकल्याण दिव्यांग मागासवर्गीय इत्यादी बाबींवर नियोजन केलेले आहे. वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. गावात विविध योजनांचा प्रचार प्रसिद्धी म्हणून जागोजागी भिंती फलक तयार करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने स्वतःची सेंट्रल सिस्टीम तयार केली असून ,सदर सिस्टीम द्वारे गावातील विविध योजनांची अभियानाची माहिती ग्रामस्थांना देण्यात येते ग्रामपंचायत ने शासनाचे सर्व दाखले संगणक पद्धतीने देण्याचे कामकाज सुरू केले आहे. शंभर टक्के दाखले संगणकीय पद्धतीने देण्यात येतात ग्रामपंचायत ने ग्रामस्थांसाठी वॉटर एटीएम ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच गावातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. गावात सिमेंट रस्ते पेवर ब्लॉक व गटारींची कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहेत 100% लसीकरण केले जाते उत्तम प्रकारची स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने नाशिक पंचायत समिती येथे गुरुवारी (दि.15) रोजी सकाळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लहवित गावाला ‘आर आर (आबा) पाटील सुंदर गाव 2023-24’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. अर्जुन गुंडे प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. रविंद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, गटविकास अधिकारी सोनिया नाकाडे, आदी उपस्थित होते. पुरस्काराचे निकष 1)स्वच्छता, 2) व्यवस्थापन, 3)दायित्व, 4)अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, 5)पारदर्शकता व तंत्रज्ञान यावर लहवित गावाची निवड करण्यात आल्याचे ग्रामविकास अधिकारी भागवत सोनवणे यांनी सांगितले.
पुरस्कार स्वीकारताना लहवित गावच्या सरपंच सत्यभामा लोहकरे, उपसरपंच निवृत्ती मुठाळ, सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड, किरण गायकवाड, संजय मुठाळ, संपत लोहकरे, सोमनाथ जारस, विनोज जगताप, शकुंतला ढेरिंगे, माधुरी गायकवाड, गायत्री काळे, श्वेता मोरे, सविता मुठाळ, विमल मुठाळ, अर्चना पाळदे, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, संपत गावंदे, आदी उपस्थित होते.