Blog

देवळालीत मविआ कडून महिला उमेदवार ?

नाशिक रोड । देवळाली मतदार संघात महायुती कडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांचे नाव निश्चित समजले जात आहे, त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून महिला उमेदवाराची चाचपणी करण्यात आल्याने देवळालीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

देवळाली राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाकरे गटाने देवळालीवर दावा केल्याने मविआ पुढे पेच निर्माण झाला आहे.   महाविकास आघाडीकडून उमेदवारी साठी ठाकरे गटाचे माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह घटक पक्षातील दोन डझन उमेदवारांची रांग लागलेली आहे, मागील आठवड्यात शिवस्वराज्य यात्रेनिमित्त विहितगाव येथे आयोजित मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनेक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या त्यातील अऩेकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

गेल्या सात वर्षांपासून रेशन कार्ड व विविध सामाजिक कार्यातून देवळालीत संपर्क असलेल्या निवृत्त तहसीलदार राजश्री अहिरराव या सध्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदावर असल्याने त्यांचे महायुतीकडून तिकीटासाठी प्रयत्न आहे. मात्र, विहितगाव येथील मेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या जयंत पाटील यांच्या समोर मविआ इच्छुकांच्या नऊ उमेदवारांनी राजश्री अहिरराव यांना उघड विरोध केल्याने त्यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली च तर इच्छुकांच्या रोषाला सामोरे जाणे महाविकास आघाडीला परवडणारे नाही. त्यामुळे राजश्री अहिरराव या सध्या महाविकास आघाडीच्या वेटींग लिस्ट मध्ये आहे.  

भाजपच्या अनुसूचित आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या प्रितम आढाव यांनी विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी कसून तयारी केली आहे. पक्षाने तिकीट दिले तर ठिक अन्यथा निवडणूक लढविणार असल्याची ठाम भूमिका घेतल्याने भाजप पदाधिका-यांना व महायुतीला बुचकळ्यात पाडले आहे. प्रितम आढाव यांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या लोकनियुक्त सदस्याच्या माध्यमातून कार्य उभे केले आहे. देवळाली कॅम्प व्यतिरिक्त मतदारसंघात युवकांची फळी तयार केली आहे. 

माजी मंत्री बबनराव घोलप यांची मुलगी तनुजा घोलप-भोईर यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघ पिंजून काढला आहे, सामाजिक कार्यातून ओळख निर्माण करुन भाजप पक्षात प्रवेश करत त्यांचा भाऊ माजी आमदार योगेश घोलप यांनाच आव्हान तयार केले आहे. माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मातोश्रीवरील काही नेत्यांवर आरोप करत लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे सेेनेत प्रवेश केला, त्यामुळे घोलप कुटुंबातील राजकीय त्रिकोण चर्चेचा विषय बनला आहे. 

माजी आमदार दिवंगत भिकचंद दोंदे यांची मुलगी सुवर्णा दोंदे यांच्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या देवळाली मतदारसंघातील महिला आघाडीची जबाबदारी असून इच्छूक म्हणून दोंदे देवळाली व ग्रामीण भागातील रस्ते, आदी समस्यांवर प्रश्न उपस्थित करत प्रचार करत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *