Blog

प्रेसमध्ये २१ वारसांना मिळाली नोकरी

नाशिकरोड, प्रतिनिधी

येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मधील सेवे दरम्यान मृत्यू झालेल्या प्रेस कामगारांच्या २१ वारसांना अखेर अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली आहे.
नोट प्रेसचे मुख्य महाव्यवस्थापक राजेश बन्सल, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर यांच्याहस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. आतापर्यंत आयएसपी व सीएनपीमध्ये ७६ वारसांना सेवेत घेण्यात आल्यामुळे कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. एक वर्षापूर्वी ५५ वारसांना नियुक्ती देण्यात आली होती.
युनियन ऑफिसमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपाध्यक्ष कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, राजू जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरुखकर, इरफान शेख, अशोक जाधव, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, बबन सैद, अन्ना सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जगदीश गोडसे म्हणाले की, वारसांना नोकरी व निवृत्त कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या. हे माझ्या कारकिर्दीतील अविस्मरणीय काम आहे. प्रेस व कामगारांच्या उन्नतीसाठी आम्ही यापुढेही सदैव तन-मन-धनाने कार्य करत राहू.

दरम्यान, यापूर्वी मृत कामगारांच्या वारसांना नोकरी ऐवजी रोख रक्कम देण्याची पध्दत होती. परंतु, २०१२ साली प्रेस मजदूर संघाची सूत्रे जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे प्रणित कामगार पॅनलकडे आल्यानंतर त्यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी यासाठी केंद्र सरकार व प्रेस महामंडळाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या प्रयत्नांना यश आले. ४ फेब्रुवारी २०१३ रोजी मजदूर संघाच्या मागणीप्रमाणे वारसांना सेवेत घेण्याचा करार झाला. त्यानुसार एक वर्षापूर्वी ५५ तर आता २१ कामगारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. या २१ जणांमध्ये आयएसपीच्या १६ आणि सीएनपीच्या पाच कामगारांचा समावेश आहे. प्रेस कामगारांनी कष्टाने उभ्या केलेल्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवलेल्या प्रेसमध्ये नोकरी मिळाल्याने वारसांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. वारसांनी कृतज्ञतेने मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आमच्या कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने आमचे जीवन अंधारमय झाले होते. जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे व त्यांच्या सहका-यांच्या आम्हाला प्रेसमध्ये नोकरी मिळाली आणि ख-या अर्थाने आमची दिवाळी गोड झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *